White माये..... ----------------------------- घराच्या पिढीजात उंबऱ्यात कित्येक माय भगिनींचा गुदमरलेला होता श्वास, अपमानाचे घाट ओलांडताना दगड, शेण अंगावर झेलून खुलं केलंस मोकळं आकाश... छळणाऱ्या, पोळणाऱ्या रुढींशी वाघिणीसारखी झुंज देऊन निर्माण केलीस समतेची वाट, तुझ्याच पाऊलावर पाऊल ठेवत तुझ्या असंख्य लेकींनी गर्दी केलीय अफाट.... परंपरेचं काटेरी कुंपण व्यवस्थेशी झगडा देऊन मोठ्या हिमतीने तोडलंस, "मनु" नं उराशी कवटाळलेल्या त्या विषमतावादी क्रूर धर्माचं पार कंबरडं मोडलंस..... कुणी विमानात, कुणी चंद्रावर कुणी राष्ट्रपतीच्या मानद खुर्चीवर आज भगिनी दिमाखाने मिरवतात, तूच त्यागातून शिकवलेले स्त्री-पुरुष समानतेचे धडे मोठ्या कुतूहलाने गिरवतात... माये तू पेटवलेला न्यायचा दिवा कोणत्याही धर्माच्या वादळात आता कधीच विझणार नाही, तू निर्माण केलेल्या वाटेवरील तुझ्या पावलांचे चिरकाल ठसे पुढे कधीच बुजणार नाही.........!! ----------------------------------------------- ©कवी - के. गणेश माय सावित्री