#चालती हो माझ्या घरातून "चालती हो माझ्या घरातुन..." आजोबा आजीला रागावले तशी छोटी मीना आईला जाऊन बिलगली. ती भेदरली होती. कारण अगदी क्षुल्लक होतं, आजीने आज आजोबांची काठी कुठेतरी ठेऊन दिली होती आणि आजीला वयोमानानुसार विसर पडला. वयानुसार आजोबांना दुखणं लागलेलं तसं आजीलाही व्हायचंच की, पण आजोबांना मात्र आजीने तिशीतल्या मुलींसारखं आपलं करावं असं वाटत राहायचं. खेडेगावच ते, तिथे कसली आलीये स्त्री पुरुष समानता आणि स्त्रीदक्षिण्य. आजी तशी खमकी होती, तोडीस तोड भांडायची, पण "माझ्या घरातून निघ" म्हटल्यावर भांडण थांबायचं. कारण आजीला माहेर राहिलं नव्हतं.