एक आठवण साहेबांची #एकदा नक्की वाचा “मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला मुख्य दरवाज्याशी ताटकळताना दिसायची. पोलीस तिला मागे ढकलायचे. संध्याकाळी गाडी बाहेर पडताना हाच प्रकार. एक दिवस गाडी पोर्चमध्ये शिरताच त्यांनी फर्मान सोडले “ त्या पिवळ्या लुगड्यातल्या बाईना माझ्याकडे घेवून या.” मुख्यमंत्राच्या दालनात तिला आणताच त्यांनी विचारले “ बाई, तुम्ही रोज का उभ्या असता? तुमचे काय काम आहे ?” थरथरत्या हाताने फाईल पुढे करत त्या बाईने एका दमात आपली कथा त्यांना ऐकवली. एका सरकारी चत्तुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची ती विधवा पत्नी होती. पतीच्या निधनानंतर वरळी सी फेस जवळच्या कर्मचारी वसाहतीमधील कंपाउंड जवळ तिने कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय सुरु केला. त्या मिळकतीवर तिच्या कुटुंबाची गुजराण चालू होती पण त्यावर कुणा अधिकाऱ्याची नजर गेली आणि “हप्ता” मागण्यास सुरुवात झाली. ती महिला मुकाट्याने हप्ता देत राहिली पण पुढे पुढे ही रक्कम इतकी फुगत चालली की तिला ते देणे परवडेनासे झाले. तिने वाढीव हप्त्याला नकार देताच तिची टपरी “अनधिकृत बांधकाम” म्हणून पाडून टाकण्यात आली आणि तिची इस्त्रीही जप्त झाली. फी भरायला पैसे नाहीत, म्हणून मुलांचे शिक्षण थांबले. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत झाली. तिची कथा ऐकून विलासराव स्तब्ध झाले, त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी त्या महिलेला बसवून घेतले. तिच्या चहाची व्यवस्था केली आणि थेट सार्वजनिक बांधकाम सचिवांना निरोप धाडला “असाल तसे निघून या. तुमच्या खात्याची कर्तबगारी आणि कार्यक्षमता दाखवायची आहे.” निरोपाचे गांभीर्य लक्षात येताच बावचळलेले सचिव आले. संतापलेले विलासराव अद्वातद्वा बोलले. तिथल्या तिथे त्यांनी आदेश दिला, “ या महिलेची टपरी जिथे होती, तिथे उभारून द्या, तिची इस्त्री परत करा. हे सारे आज संध्याकाळी मी घरी जायच्या आत व्हायला हवे आणि उद्या तिथल्या “त्या” कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला माझ्या समोर उभे करा, माझी कर्तव्यदक्षता त्यांना दाखवून द्यायची आहे. येताना त्यांना घराचे सामान आवरूनच यायला सांगा. त्यांना कुठे पाठवायचे ते मी ठरवले आहे.” सचिवांची गाळण उडाली. विलासरावांच्याच गाडीतून तिला वरळी सी फेस ला नेण्यात आले.