Nojoto: Largest Storytelling Platform

कधी हसवले, कधी रडवले या कवितेने सुखदुःखाशी सूर जु

कधी हसवले, कधी रडवले या कवितेने 
सुखदुःखाशी सूर जुळवले या कवितेने

उगाच नाही एकरूप मी झाले इतके 
जीवनगाणे मला शिकवले या कवितेने 

हृदयाच्या गर्भात उसळली तीव्र वेदना
नजाकतीने तिला प्रसवले या कवितेने

कुठून आले तिच्यामधे बळ मला कळेना 
दु:खाचे अंगार विझवले या कवितेने 

फकीर होते केवळ मी या दुनियेमधले
अता कलंदर मला बनवले या कवितेने 

हळव्या ओलीताचे होते काळिज माझे  
क्रांतीचेही बीज रुजवले या कवितेने 

मीठ चोळले या दुनियेने ज्या जखमेवर
त्या जखमेवर मलम मढवले या कवितेने

सुजाता दरेकर (मेश्राम)
22/03/2023

©Sujata Darekar 
  #Mylifemypoem