Nojoto: Largest Storytelling Platform

प्रितकाव्य (एकादशाक्षरी).... सुख... लागत नाही सा

प्रितकाव्य (एकादशाक्षरी)....

सुख...

लागत नाही सागराचा थांग  
लाख खटाटोप करते लाट 
गवसत नाही सुखाचा माग
खडतर ही जीवनाची वाट 

सुख असते एक मृगजळ
जसे पानांवरले दवमोती 
धरू जाता फसगत अटळ
क्षणांत सुखे मातीमय होती

चुकूनही वाच्यता नका करू 
सुख जपावे मनाच्या गर्भात
बुडूनिया जाते सुखाचे तारू
मांडिता सोहळे चारचौघांत

मोहफुलासम सुखाचा गंध 
वेडावतो तमाम जगताला
कणभर सुखात होती धुंद
कवळूनी मणभर दुःखाला

नियतिकडेच असती फासे
खेळवी अविरत हवे तसे
 दैवाचा न्याय वेगळाच असे
मग कुणी रडे वा कुणी हसे

जुगार भावनांचा चाले असा
तन, मन, धन पणा लागती 
दुःख म्हणजे निःपक्ष आरसा
उमगती त्यातून खरी नाती

समाधानात जो सुख मानतो
ज्याला मिळे तो धनी आनंदाचा
परिस टाकून काच वेचतो 
तो कर्मदरिद्री शतजन्माचा

©प्रितफुल (प्रित)
  सुख