Nojoto: Largest Storytelling Platform

कोणते? सांग दुःखा नेमके गातोस गाणे कोणते? कोणत्या

कोणते?

सांग दुःखा नेमके गातोस गाणे कोणते?
कोणत्या आहे कुळीचा अन् घराणे कोणते?

घेतले निवडून होते मी दळाया जोंधळे...
ना भरडले टाकता जात्यात दाणे कोणते?

केवढा फिरलो तरी ना चालले माझे चलन...
भामट्यांचे चालते ते सांग नाणे कोणते?

रक्त नाही वाढले ना भक्त माझे वाढले...
दे कळू नेते तरी खातात खाणे कोणते?

देत होत्या बायका त्या शाप पाणी शेंदता...
ऐकले तालात एका ते उखाणे कोणते?

जयराम धोंगडे, नांदेड

©Jairam Dhongade
  #agni