#विशालाक्षर #विठोबाची_कविता विठोबाची पावलं... आता झिजत चाललीत.. टेकणाऱ्या प्रत्येक माथ्याला एकेक कण स्वाधीन करत विरत चालली आहेत... एके दिवशी पावलांसहीत तोच दिसेनासा झाला तर? भांडायचं कुणाशी मग मी हक्कानं... मोकळ्या विटेकडे कशी मागावी उत्तरे चक्रव्युहांची.. कोरड्याठाक पडलेल्या अनंत खोल गाभाऱ्यात कसं उगवायचं पुन्हा पुन्हा....? वारीअंती भरल्या डोळ्यांनी कुणाकडे पाहायचं डोळे भरून..? ब्रम्हतत्व व्यापून राहिलेलं असतं म्हणे सर्वत्र...... सगळं सगळं मान्य.. परंतु आईच्या कुशीचा खराखुरा स्पर्श नुसत्या आठवणींत नाही ना मिळत... विठ्ठला.. विठ्ठला.. अजून लाखो युगे तरी... असाच इथे थांब.. तुला परवानगी नाही झिजण्याची.. तू बंदी आहेस तुझ्या प्रेमात असणाऱ्या या प्रत्येक जीवाचा...!! - विशाल पोतदार ©Vishal Potdar #Chalachal