#विशालाक्षर नव्या कोऱ्या घराच्या नांदीत जुनी भिंत उतरवताना मनाच्या खिडक्या गलबलल्या खूप आत एक बाळ मुसमुसून रडू लागलं.. त्या पांढऱ्या मातीच्या अफाट जगातला माझा पहिला श्वास पहिला शब्द पहिलं हसू पुन्हा फेर धरू लागले व्याकुळ नजरेने.. फुटक्या कौलातून पाहिलेला प्रत्येक चंद्र सगळ्या सगळ्या चांदण्या घेऊन सांत्वन करायला उतरून आला पण मन मानत नाही... काही क्षण तरी नाहीच... कसे खोडावे त्या भिंतींवर फिरलेले हात कसे बुजवावेत रुसल्यावर कुशीत घेणारे कोपरे कशा काढून टाकायच्या काही क्षण आयुष्य टांगून ठेवता येणाऱ्या खुंट्या काही काही कळेनासं झालं रडू ही कोसळत नव्हतं काही भरल्या क्षणांनंतर घराच्या मऊ कुशीत रुसल्या मनाला निजवून बांधून घेतली आठवणींचा पाणवठा जन्मोजन्मी पुरेल इतकी मूठभर मातीची शिदोरी..... - विशाल पोतदार ©Vishal Potdar