ताण कामाचा बाळ,जरा कमीच घेत जा मी राहील कशीही रे पण,तू मात्र वेळेवर जेवत जा ||धृ|| पोटात होतास माझ्या,तेव्हा पडला होता दुष्काळ खुप मेली माणसं,काही जगत होती खाऊन भातडाळ भरघोस धान्य असुनही घरात,आता का केलास मला वजा मी राहील रे इकडे कशीही,तू मात्र वेळेवर जेवत जा||१|| शाळेत जायला लागलास,तेव्हा वाटलं मोठा माणूस होशील संपतील गरिबीचे दिवस,सुखशांती घरात येईल मोठा तर झालास पण,समजू शकला नाही माझी इजा कसही काढीन राहिलेले दिवस इथं,पण तू वेळेवर जेवत जा||२|| हल्ली मला तुझ्या बापाची,आठवण खुप येतेय म्हणायचा बघ आपलं पोर,आपल्याला कसं सुखात ठेवतयं हेच सुख पाहण्यापेक्षा,बरं झालं घेतली त्यानं रजा मी राहील कशीही रे पण,तू मात्र वेळेवर जेवत जा||३|| इच्छा होती माझी,नातवंडांसोबत खेळावं खेळ भातुकलीचा,पुन्हा एकदा मांडावं असा कसा माझाच खेळ भातुकलीचा,मांडलास रे राजा सावरेल मी स्वत:ला पण,तू मात्र वेळेवर जेवत जा||४|| थकलेय आता मी,कंटाळा आलाय जीवनाचा हातपाय पण चालत नाहीत,श्वासही गुदमरतोय माझा भगवंता उचलत का नाहीस, सोसत नाही असली सजा मी आहे व्यवस्थित बाळा,तू मात्र तुझी काळजी घेत जा||४|| -विशाल पंडित © #व्यथा_वृद्धाश्रमातल्या_आईची....