Nojoto: Largest Storytelling Platform

पसाराच सारा... (महानाग / ४०/लगागा /८) बियाणे रु

पसाराच सारा... 
(महानाग / ४०/लगागा /८) 

बियाणे रुजावे बियाणे कुजावे
परत सांधणीचा पसाराच सारा  ! 
अता राहिली ना कृषी फायद्याची
भिके लागणीचा पसाराच सारा  ! 

तणाला किती जोर आला पहा रे
पिकाला जणू सर्प विळखा पडावा
डवरणी-खुरपणी विळे पास शोधा
गवत काढण्याचा पसाराच सारा  ! 

कधी दावणीला कधी सावलीला 
गुरा वासराना सदा घट्ट बांधा
गवत-पेंड चारा दुधाच्या म्हशीला
गुरे राखणीचा पसाराच सारा  ! 

चला रातच्याला जरा जागण्याला
मळ्यावर बसा अन् पुरे लक्ष ठेवा
गवे-रानगाई नि हरणे पिटाळा
फुका जागलीचा पसाराच सारा  ! 

अवेळी तडाखा कधी पावसाचा
उधळतो सुगीचा कसा बेत सारा
झणी गंजलेले विळे धार लावा
पिके कापणीचा पसाराच सारा  ! 

किती कर्ज झाले किती व्याज गेले
खुळे स्वप्न माझे तडीपार झाले
लिहावी पुसावी उधारी कितीदा
उगी लेखणीचा पसाराच सारा  ! 

मुजवली खते अन् फवारे किती ते
खरीपास फटका कधी फोल रब्बी
तयारीस लागा वखर चालवा रे
पुन्हा पेरणीचा पसाराच सारा  !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता. पुसद जि. यवतमाळ

©Satish Deshmukh
  psara
पसार 2
#simplicity

psara पसार 2 #simplicity #मराठीकविता

108 Views