Nojoto: Largest Storytelling Platform

White कैफियत राधेची......... कान्हा रे कान्हा मी

White कैफियत राधेची.........

कान्हा रे कान्हा मी आले अवचित
अवतरले उतार वेळी तुझिया द्वारकेत

आगंतुक भासे जरी माझी भेट
निवडक प्रश्न काही विचारेन थेट...
प्रश्न विचारणे तर केवळ निमित्त..
मनी शेवटले कोरून घेण्याचे हट्ट...

यमुनेच्या किनारी, ते कोवळे मन
बागडले धुंद बावरी, तुझीच होऊन
आता तरी टिपूदे, तुला काही क्षण
आठवांची शिदोरी, मनसोक्त घेऊन....

कालिंदीच्या तटावरी, ते मंतरलेले दिन
कंकणांचे सूर, अन् पैजणांची किणकिण
वेणुचा आरव, अन कुंजवनी रासरिंगण
ओशाळून मी उभी, तुलाच लीन होऊन....

गोकुळ मागे सरले, मीही माझी न उरले 
थकली सारी गात्रे, अन दिवसही ओसरले 
शेवटली भेट तुझी, घ्यावी असे  ठरविले
परी बळ सारे देहाचे, हृदयी मी एकवटले....

भेटलास आज जेव्हा, बासुरी नव्हती
म्हटलास कसा, ती तुझीच खूण होती
पुन्हा कधी अधरी, वेणू विसावली नाही
जणू माझ्याचसाठी ती निनादली होती....

ही रात्र द्वारकेची, मनी भावनांचे उमाळे
भेटीस येऊदे परी, माझे  गोकुळ पुराणे
बोलुदे आता मज, मनसोक्त भरभरून
घेउदे मज एकदा, कृष्ण शेला पांघरून

बघ उत्तररात्र सजली, उरले किती क्षण
तुझा वियोग श्रीहरी, या क्षणी अटळ 
हाची अंतिमक्षण, स्मरणात साठवून
मनी हीच खूण, आता जन्मभर जपेन....

हात सोडून कान्हा, गेलास तू निघून
नेत्रात आता तुझे, केवळ चित्र स्मरून
कधीच झाली केशवी, अंतर्बाह्य परिपूर्ण
तेवते श्रीराधा, तुझ्यात विलीन होऊन....

अमिता

©Amita
  #राधा   मराठी कविता
asj6456746298564

Amita

New Creator

#राधा मराठी कविता #मराठीकविता

126 Views