Nojoto: Largest Storytelling Platform

Best गोदातीर्थ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best गोदातीर्थ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 10 Stories
    PopularLatestVideo

उमा जोशी

संध्यासमयी येता आठव जीव खुळा तो होई
जाता नाही याद जात ती डोळा पाणी येई
तुझी आठवण छळे मनाला कातर संध्याकाळी
आणिक सोबत तुझ्या राजसा मागे मागे नेई

त्यावेळेची ओढ आठवुन मोहरून मी जाते
स्पर्श तुझा मग मनास होतो गाली लाली चढते
फरफट होते माझी तेथे आठवणींच्या गावा
तरी खुळी मी मनापासुनी प्रेमगीत ते गाते

सोबत नेसी आणिक जासी तिथे सोडुनी मजला
केला आहे सांग ना मला असा गुन्हा मी कसला
किती वाट मी अजून पाहू किती आसवे गाळू
ये ना परतुन अखेरचा हा माझा उत्सव सजला

तुला एकदा बघेन भरुनी डोळे थकले माझे
डोळ्यांमध्ये अजूनही रे तुझीच प्रतिमा साजे
अंती व्हावी भेट आपुली असे एवढी इच्छा
कधीपासुनी पैलतिरी बघ मृत्यूघंटा वाजे

येणे नाही परतुन आता निरोप हा शेवटला
जाते निघून मनात आता संशय नाही कसला
तेवढीच ती संगत होती लिहिली सखया भाळी
पाहशील तू आठवणीतच तुझिया आता मजला

--- उमा जोशी २८/०४/२०२१

©उमाच्या मनातलं #गोदातीर्थ #आठवण #लवंगलता

उमा जोशी

मावळतीला जाता दिनकर सांज उतरते
गर्द होतसे अंधार आणि रात्र पसरते
लुकलुक करती नभी तारका चंद्र हासतो
अलगद शीतल वाऱ्याची ती झुळुक येते

झाडे वेली निजल्या असती नदीकिनारी
वाळूवरती चंद्र चांदणे मोहक पसरी
हळूच चुंबन काठाचे त्या लाटा घेती
नभी चांदणी शुक्राची ती हसे लाजरी

अशीच अलगद सरेल रजनी पहाटवेळी
दिसू लागता सूर्यकिरणांची प्रभा आगळी
जगास साऱ्या जाग येईल पुन्हा नव्याने
मुले माणसे कामात व्यग्र असती सगळी

वाट पाहते धरा तरीही ती रात्रीची
अशी असे ही प्रीत आगळी शशी धरेची
नित्य भेटती एकमेकांस दोघे रात्री  
यांच्या सम ती नसे प्रीत हो जगी कुणाची
 ---- उमा जोशी २०/०३/२०२१

©उमाच्या मनातलं #गोदातीर्थ #अनलज्वाला #शशीधराप्रीत

#moonlight

उमा जोशी

आयुष्याची शाळा मोठी अवघड आहे
अनुभूतीचा शिक्षक मोठा जालिम आहे

रोज उत्तरे वेगवेगळी मागे बाई
न संपणारा सराव इथला कठीण आहे

बघून लिहिण्या दुसऱ्याचे ती मुभाच नाही
प्रत्येकाचा पेपर इथला स्वतंत्र आहे

पडलो झडलो तरी न कोणा चिंता कसली
जो तो येथे गर्क आपल्या धुंदित आहे

निकाल केव्हा असे आपला माहित नाही
जरी परीक्षा क्षणोक्षणीची रोजच आहे

मृत्यूद्वारी हिशोब होतो चोख सर्वथा
जमा खर्च तो कर्मफलाचा समान आहे

----उमा जोशी १७/०३/२०२१

©उमाच्या मनातलं #गोदातीर्थ #कर्मफल #अनलज्वाला 

#colours

उमा जोशी

रंग केशरी सांज ल्यायली कातरवेळी
तुझी आठवण येते मजला संध्याकाळी
दिली घेतली कितीक वचने दोघांनीही
कसे संपले सारे काही असे अवेळी

तुटले नाते कसे अचानक कळले नाही
जाता जाता निघून कोणी वळले नाही
कसला रुसवा राग कोणता होता तेव्हा
परंतु ओठी शब्द आपल्या आले नाही

असे जरी हा करार झाला न लिहीलेला
ऐक सांगते प्रसंग मजला आठवलेला
निरोप घेता डोळा पाणी दोघांच्याही
रुतून बसला मनात तो क्षण अवघडलेला

काय असे हे झाले आहे मला कळेना
अडकुन राही मनी हुंदका प्रश्न सुटेना
हाक दे मला सख्या कधीही मनापासुनी
तुझ्याविना रे माझा सखया जीव रमेना

©उमा जोशी १७/०३/२०२१

©उमाच्या मनातलं #गोदातीर्थ #अनलज्वाला #तुझ्याविना

उमा जोशी

भेट आपली होता येथे
अवचित थोडा काळ थांबला
घेता हात तू हाती माझा
रंग प्रितीचा गाली चढला

गळून पडले सारे किंतू
घेतलेस तू जेव्हा जवळी
याच क्षणाची वाट पाहते
सजणा माझी प्रीती भोळी

विसर पडे ना उरे भान ते
वाटे सारे हवेहवेसे
तरी मनाची समजुत घाली
तुझे नकोसे असे उसासे

मर्यादा ती नकोच तोडू
तुझे सांगणे सदैव असते
तुझे नि माझे नाते सखया
दवबिंदू परि मोहक दिसते

वाट किती रे अजून पाहू
मिलनासाठी मी तळमळते
घडोन यावी ऐसी जादू
नकोच आता बंध कोणते

जगणे मरणे केवळ संज्ञा
अमर असे रे प्रेम आपले
जीव गुंतला दोघांचाही
कधी कुणाला नाही कळले

परंतु आता पुरे प्रतीक्षा
नकोच कसला विरह जरासा
सदैव लाभो मला असा तो
सहवास तुझा हवाहवासा

होऊ आपण एकरूप रे
नको दुरावा दोघांमध्ये
जन्मोजन्मी सोबत अपुली 
असेच लिहिले नशिबामध्ये

© उमा जोशी १५/०३/२०१२१

©उमाच्या मनातलं #गोदातीर्थ #पादाकुलक #सोबत

उमा जोशी

ग्रीष्माची ती उष्ण काहिली रान सारे सुकून गेले
कोठेही ना वाहे वारा घालमेल ती अवघी झाली
घामाच्या ह्या वाहे धारा कोरड पडते सतत घशाला
पाणवठेही सुकले सगळे अशी धरेची दैना झाली

श्रावणधारा कोसळता मग हिरवे हिरवे रान दिसे हे
नववधू अशी ती नटलेली सृष्टी शालू अवघा ल्याली
पक्षी कूजन सनई भासे मेघांचा तो झडे चौघडा
टपटपणारे थेंब अक्षता सुगंध पुष्पे अत्तर झाली

सवे भादवा घेउन येतो क्षण सारे हे आनंदाचे
गौराईला पुजायला गं माहेराला मुलगी आली
असे सुखाचे सारे क्षण हे मनी कोंदणी जपून ठेवी
अशीच असते छोटी घटना जगण्याचे जी कारण झाली

-- उमा जोशी २५/०२/२०२१

©उमाच्या मनातलं #गोदातीर्थ #वनहरिणी #आनंद

उमा जोशी

चंद्र नभीचा मागे राघव वाटे कौतुक कौसल्येसी
परि न उलगडे तिजला कोडे आणू कैसा चंद्र खालती
सोने चांदी माणिक मोती जडलेली ती किती खेळणी
चित्त तरीपण श्रीरामाचे जडे नभीच्या चंद्रावरती

राजा दशरथ हसतो गाली पेच पडे हा साऱ्यांनाही
उपाय कसला योजू आता राण्या तिन्ही विचार करती
कौतुक करती सारे परिजन श्रीरामाच्या या लीलांचे
जो तो गुंते मोहिमेत या शोधण्यास ती नामी युक्ती

कौसल्येसह राण्या दोन्ही प्रयत्न सारे करून थकल्या  
तेवढ्यात ते सुमंत मंत्री रामापाशी तेथे येती
हट्ट ऐकुनी विचार करूनि आसपास ते बघता मंत्री 
पटकन सुचली युक्ती त्यांना चंद्र आणुनी देतो म्हणती

जमिनीवरती चंद्र नभीचा दिसे ठेवता एक आरसा
आनंदाचे हास्य फुले ते श्रीरामाच्या ओठांवरती
दिसता राघव तो आनंदी राजाराणी पण सुखावले
क्षणात कोडे अवघे सुटले मोद पसरला हो सभोवती

----- उमा जोशी २१/०२/२०२१

©उमाच्या मनातलं #गोदातीर्थ #चंद्र नभीचा

उमा जोशी

सायंकाळी कातरवेळी दिली घेतली वचने सारी
कुजबुजलेले अलगद कानी आकाशाला कळले नाही
कधी अधर तर नेत्र कधी ते सारे काही सांगत होते 
शब्दावाचुन कळे भावना नको बोलणे आता काही

प्रेमाने तू कवेत घेता गोड शहारा उठतो अंगी
हवेहवेसे वाटू लागे स्पर्श गुलाबी दोघांनाही
भाव मुके पण स्पर्श बोलके प्रीत आपली पाहे रजनी
एकरूप ते झालो आपण द्वैत न आता उरले काही

पडता लोभस असे चांदणे खुले खळी तव गालावरती
लुकलुकती त्या किती तारका चंद्र नभीचा तुलाच पाही
नको दुरावा दोघांमध्ये तुझे न माझे नुरे वेगळे
अखंड राहो अशीच सोबत नसे मागणे अजून काही

उमा जोशी १८/०२/२०२१

©उमाच्या मनातलं #गोदातीर्थ #वनहरिणी

उमा जोशी

इकडे तिकडे चहु बाजूला
घुमतो वारा शीळ घालुनी
गूज सांगतो तुझ्या मनीचे
अलगद माझ्या सारे कानी

                       जातोस कुठे मज समजेना
                       अवचित वाजे मंजुळ पावा
                       तरंगते मी सुरावटीवर
                       करते मन मग तुझाच धावा

तव भेटीची ओढ लागते
मनास पडते भूल कोणती
आवरूनही मन नावरते
घडली जादू अशी कोणती

                     असे सत्य की भास असे हा
                     आसमंत बघ दिसे आगळा
                     वळता भोळी गोरी राधा
                     समोर दिसतो कृष्ण सावळा

दिसता कान्हा बावरते मन
प्रेमळ लाटा मनात उठती
मंजुळ वेणू वाजविताना 
रमुया दोघे झोक्यावरती

                    नसे ठाऊक तुला मला हे
                    वाटे व्हावे तुझी सावली
                    एकच माझे असे मागणे
                    अखंड राहो साथ आपली

---- उमा जोशी ११/०२/२०२१

©उमाच्या मनातलं #गोदातीर्थ #पादाकुलक #एकमागणे 

#Krishna

उमा जोशी

आयुष्याच्या संध्यासमयी
वर्षे मधली गळून पडली
याद प्रियेची आता मजला
हलके हलके छळू लागली

कोण चूक अन् कोण बरोबर
नकोच याची चर्चा आता
सहजच नकळत ये परतूनी
माझ्यापाशी जाता जाता

आता कसला राग धरावा
उरले बाकी काही नाही
हाती मिळता हात तुझा तो
बोलायाचे काहीबाही

सरले माझे मीपण अवघे
कळले सारे दोष मनाला
अधीर हे मन आता झाले
क्षमा तुझी गं मागायाला

भेटशील ना एकच वेळा
थोडेसे क्षण माझे उरले
गोड बोल तव कानी पडता
रुसवे सारे ते विरघळले

जातो आता सुखानेच मी
आस न काही मागे उरली
डोळे सारे तुझे सांगती
उरली मागे प्रीत आपली 

--- उमा जोशी ०६/०२/२०२१

©उमाच्या मनातलं #प्रीत_आपली #गोदातीर्थ #पादाकुलक

#moonlight
loader
Home
Explore
Events
Notification
Profile